काही अविस्मरणीय प्रसंगांचे आपण साक्षीदार ठरणे हा केवळ योगायोग नसतो. कुठलेही कार्य करताना आपण ज्या प्रामाणिक भावना जोपासतो, त्याची ती फलश्रृती असते. दंदे हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पिनाक दंदे यांच्याही बाबतीत तसेच आहे. वैद्यकीय असो वा सामाजिक, कुठलेही कार्य प्रामाणिक भावनेतून करण्याचा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक मधुकर कुकडे यांच्या पत्नी व लेखिका सुभाषिणी कुकडे यांच्या कथासंग्रहाचे दंदे हॉस्पिटलमध्ये प्रकाशन झाले, त्यावेळी याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
सुभाषिणी कुकडे यांचा ‘मॉम यू आर ग्रेट’ हा कथासंग्रह गेल्या वर्षभरापासून प्रकाशित होऊन तयार आहे. पण विविध अडचणींमुळे त्याच्या प्रकाशन सोहळ्याचा योग टळत होता. दीड महिन्यांपूर्वी सुभाषिणी कुकडे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दंदे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दिवसेंदिवस प्रकृती खालावत होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांचे शरीर आणि वय साथ देत नव्हते. मात्र या सगळ्यांत आपल्या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा व्हावा, अशी इच्छा त्या वारंवार पती मधुकर कुकडे आणि डॉ. पिनाक दंदे यांच्याकडे बोलून दाखवत होत्या. दोन दिवसांपूर्वी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची वेळ मिळाली आणि ते प्रकाशनासाठी थेट दंदे हॉस्पिटलमध्ये आले. पण त्यावेळी सुभाषिणी कुकडे या आयसीयूमध्ये होत्या. डॉ. पिनाक दंदे यांनी कथासंग्रहाचे प्रकाशन हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये नाही तर आयसीयूमध्ये होईल, असे मधुकर कुकडे यांना सांगितले. जोखीम होती, पण लेखिकेच्या इच्छेपुढे ही जोखीम काहीच नव्हती. त्याप्रमाणे सुभाषिणी कुकडे यांच्या आयसीयूतील बेडशेजारी पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी मधुकर कुकडे, नाना पटोले, डॉ. पिनाक दंदे, आमदार विकास ठाकरे, बाबुराव तिडके, आमदार अॅड. अभिजीत वंजारी, ज्येष्ठ संपादक गजानन जानभोर, विशाल मुत्तेमवार, याज्ञवल्क्य जिचकार आदींची उपस्थिती होती. प्रकाशन झाल्यावर चार तासांनी सुभाषिणी कुकडे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जीव कथा संग्रहात होता. हे त्यांचे सहावे पुस्तक होते. ही घटना वाऱ्यासारखी नागपुरात पसरली. माध्यम विश्वातून अनेकांनी डॉ. पिनाक दंदे यांच्याशी संपर्क साधला. या घटनेची भावनिक दखल सर्व वर्तमानपत्रांनी घेतली. सर्व संपादक व प्रतिनिधींचे आभार केवळ एवढ्यासाठी की, त्यांनी एका कुटुंबाला दुःखाच्या प्रसंगातून सावरण्यासाठी एक निमीत्त दिले.