निःशूल्क प्रसूती

डॉ. दंदे हॉस्पिटलने कोरोनाग्रस्त गर्भवतींच्या प्रूतीसाठी पुढाकार घेतल्याची बातमी संपूर्ण विदर्भात वाऱ्यासारखी पसरली. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा अश्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून विचारणा होऊ लागली. यावरून प्रशासनाने गर्भवतींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची बाब पुढे आली. डॉ. पिनाक दंदे आणि डॉ. सीमा दंदे यांनी हे आव्हान स्वीकारले आणि सगळीकडे रुग्णांची लूट होत असल्याचे चित्र असताना एका कोरोनाग्रस्त महिलेची निःशुल्क प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. प्रियंका नितीन जाधव या महिलेने नवऱ्यासोबत खासगी व सरकारी रुग्णालयांचे उंबरे झिजवले, पण कुणीही तिला दाद दिली नाही. उलट दोन अडिच लाख रुपये खर्च येईल म्हणून एका खासगी रुग्णालयाने परत पाठवले. तर सरकारी रुग्णालयाने पुन्हा चाचण्या करण्यास सांगितले. पण डॉ. सीमा व डॉ. पिनाक दंदे यांनी प्रियंकाच्या वेदना ओळखल्या आणि एकही रुपया न घेता तिची प्रसुती केली.पैसा कमावण्याचे दिवस परत येतील पण माणुसकीचा झरा आटायला नको, या आपल्या निर्धाराची प्रचितीच त्यांनी दिली.